डॉक्टर-परिचारिकांनी केला देवेंद्र फडणवीसांचा तीव्र निषेध

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्यभर दौरा करून परिस्थितीचा आढावा घेत आहे. परंतु, जळगावमध्ये उल्हासराव पाटील वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचार्‍यांनी निषेध करीत कामबंद करण्याचा इशाराही दिला आहे.

जळगाव जिल्ह्यातील साकेगाव येथील डॉ. उल्हासराव पाटील वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली होती. पण, अशा वक्तव्यांमुळे डॉक्टर्स, परिचारिका, स्टाफ हे व्यथित होत असल्याने त्याचा परिणाम रूग्णसेवेवर होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोदावरी हॉस्पिटलमध्ये रुग्णाची गैरसोय. होते. सेवा शुश्रूषा व्यवस्थित होत नसल्याचा आरोप केला. या आरोपाचा गोदावरीच्या डॉ उल्हास पाटील मेडिकल महाविद्यालयातील परिचारिकांनी तीव्र निषेध केला असून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत केलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाशी संबंधित निराधार आरोप राजकीय नेत्यांकडून केले जात आहे. प्रत्यक्षात कुठलीही वस्तुस्थिती जाणून न घेता वारंवार डॉ. उल्हास पाटील रूग्णालयावर रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप केले जात आहे. ’गेल्या दोन महिन्यांपासून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स, वॉर्डबॉय, सफाई कामगार असे अनेक जण स्वत:च्या घरापासून लांब राहुन रात्रंदिवस रूग्णसेवेसाठी राबत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न काही तथाकथित राजकीय नेत्यांकडून केला जात आहे’ असे मत रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी व्यक्त केले आहे.