ठाकरे सरकार पाडण्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा दावा, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘महाराष्ट्रात कोणतेही ऑपरेशन लोट्स हाती घेतले नाही. ठाकरे सरकार हे सूडबुद्धीने काम करत आहे. हे सरकार पाडण्याची आवश्यकता नसून एक दिवशी ते स्वत:हून कोसळेल, जर स्थिती उद्भवली तर आम्ही सरकार स्थापन करु’, असे म्हणत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्षनेता या नात्याने सरकारच्या चुका लक्षात आणून देण्याचे काम करत असून कोरोना काळातही आम्ही आरोप केले. राज्यात आम्ही कोणतेही ऑपरेशन लोट्स हाती घेतले नाही. एक दिवस हे सरकार स्वतः कोसळणार आहे. यामुळे हे सरकार पाडण्याचा विषयच येतं नाही. मुळात असे सरकार चालतच नाही. ज्या दिवशी सरकार पडेल, तेव्हा परिस्थितीनुसार, शक्य असल्यास आणि गरजेचं वाटल्यास सरकार बनवू’ असे फडणवीस यांनी सांगितले.

खडसेंचे आरोप बिनबुडाचे
भाजपच्या मोठ्या नेत्यांना बाजूला सारले का ? याबाबत बोलताना फडणवीस यांनी म्हटलं की, ‘कोअर टीमच्या माध्यमातून सर्व निर्णय घेत असतो. भाजपच्या टीमवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमच्या पक्षात असे काही नाही. पाच वर्षे सरकार चालवले म्हणून नागरिकांचे प्रश्न घेऊन रोज चर्चेत असतो. जनतेच्या नजरेत आपण पुढे जातो, नाव जास्त समोर येत नाही. नवीन टीमही तयार झाली आहे. मात्र, जुन्यांना बाजूला केले नाही’. तसेच ‘एकनाथ खडसे यांच्या आरोपात काही तथ्य नाही. त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार नाही’, असे फडणवीसांनी नमूद केले.

इन्कम टॅक्सने शरद पवार यांना पाठवलेल्या, नोटिसीबाबत फडणवीस यांनी मांडली पक्षाची भूमिका
“आम्ही कोणालाही त्रास देत नसून, दोन जणांनी केलेल्या तक्रारीवरुन कारवाई सुरु आहे. चंद्रकांत पाटील आणि माझ्याबद्दल सुद्धा तक्रारी केल्या होत्या. जर आम्हाला राजकारण करायचे असते तर दोन महिन्यांपूर्वी केले असते. त्यावेळी ही नोटीस दिली असती. कायदा आपले काम करत आहे.”, असे फडणवीसांनी सांगितले. ‘बिहार निवडणुकीसाठी पक्षाने प्रभारी म्हणून नेमणूक केली. मधल्या कालखंडात अनेक नेते गमावले. म्हणून पक्षाने ही नवीन टीम केली आहे. माझी निवड झाली म्हणजे मी काही महाराष्ट्रातून निरोप घेतला नाही”, असे म्हणत राष्ट्रीय राजकारणात जाणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.