फडणवीसांचा विधानसभा अध्यक्षांना मिश्किल सवाल, म्हणाले- FASTag गाड्यांना लावायचा की आमदारांना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि. 3) घडलेल्या एका घटनेवरून सभागृहात एकच हास्यकल्लोळ पसरला. आमदारांना फास्टॅग लावण्याची सुविधा विधीमंडळाच्या परिसरात उपलब्ध करून दिल्याचे सांगत सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विधानसभेचे काळजीवाहू अध्यक्ष नरहरी झिरवळ केले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उभे राहत झिरवळ यांना एक प्रश्न केला. अध्यक्ष महोदय FASTag हा गाड्यांना लावाचा की आमदारांना असा मिश्किल सवाल त्यांनी यावेळी केला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.

सभागृहात अध्यक्ष झिरवळ यांनी यावेळी एक सूचना वाचली. विधानसभेच्या सदस्यांना FASTag चे मोफत वाटप केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु ही सूचना वाचताना झिरवळ यांना फास्टॅगचा उल्लेख फॉस्टिंग असा केला. त्यानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांनी त्यांना ही चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर झिरवळ यांनी ही सूचना घाईघाईत वाचताना आमदारांना फास्टॅग लावण्याची सुविधा विधीमंडळाच्या परिसरात उपलब्ध करून दिल्याचे सांगत सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे म्हटले होते.