फडणवीस यांची शिष्टाई निष्फळ; अण्णा हजारे उपोषण करण्यावर ठाम

पोलिसनामा ऑनलाईन, राळेगण सिद्धी, : केंद्रीय कृषीमंत्र्यांचे पत्र घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. दोघांत बराच वेळ शेतकर्‍यांच्या प्रश्नाविषयी चर्चा झालीय. परंतु, मी माझ्या 30 जानेवारीच्या उपोषणावर ठाम आहे. त्यात काही बदल नाही, असे सांगत अण्णा हजारे यांनी उपोषणाचा निर्धार कायम असल्याचे जाहीर केलंय.

स्वामिनाथ आयोगानुसार शेतीमाला हमीभाव मिळावा. केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तत्ता मिळावी, यासाठी 30 जानेवारीपासून हजारे यांनी राळेगण सिद्धीत उपोषणाला बसणार आहे, असा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज ( दि. 22 ) सायंकाळी उशीरा राळेगण सिद्धीत येऊन हजारे यांची भेट एक तास चर्चा केलीय. यावेळी आमदार गिरीश महाजन, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार बाबूराव पाचर्णे आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांचा निरोप घेऊन आपण हजारे यांची भेट घेऊन चर्चा केलीय. त्यांनी उपस्थित केलेल्या शेतकर्‍यांच्या प्रश्नांसंर्भातील 9 मुद्दयांवर सविस्तर चर्चा करून ते समजून घेतलेत. अण्णांच्या काही पत्रांना केंद्राकडून उत्तर दिलंय. परंतु, अण्णांना थातूरमातूर उत्तर देणे योग्य नसल्याने आणि काही बाबी या धोरणात्मक असल्याने अण्णांची भूमिका मी समजून घेतली आहे. ती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्याकडे मांडणाराय.

केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा करून अण्णां हजारेंनी मांडलेल्या शेतकर्‍यांचे प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत. तसेच कृषीमंत्री तोमर अण्णांच्या पत्रांना सकारात्मक आणि ठोस निर्णयाचे उत्तर देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीतील मागील उपोषणाच्या वेळी आपण लोकायुक्त कायद्यासाठी मसुदा समितीच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. आमचे राज्य सरकार बदलले आहे. सध्याचे सरकार लोकायुक्त कायद्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे समजत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अण्णा हजारे यांचे मन वळवून त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी केलेली शिष्टाई निष्फळ ठरली का ? असे पत्रकारांनी विचारले असता ही केवळसुरूवात आहे. अण्णा हे समाज आणि महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यांनी उपोषण करावे, ही राज्यातील व देशातील कोणाचीही इच्छा नाही. त्यांच्यावर उपोषणाची वेळ येणार नाही, यासाठी आपण प्रयत्नशील आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.