मुख्यमंत्री ठाकरेंनी 100 कोटींची घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची नवी मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणाने तोंड दिले. मात्र, चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपिरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे रहावेच लागेल, म्हणून रायगड जिल्ह्याला तातडीची मदत म्हणून राज्य शासनाकडून शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. परंतु, त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजून एक मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई आणि कोकण विभागामधील लोकप्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करुन एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. शेती, फळबागा, घरे, मासेमार, वृक्ष उन्मळून पडणे, जनावरांचे मृत्यू असे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले असल्याने राज्य सरकारने तातडीने कोकणवासीयांना मदत करण्याची गरज आहे. तसेच वीज आणि दूरध्वनी सेवा अद्यापही खंडित आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून रोखीने मदत करण्याची नितांत गरज आहे.’

पुढे त्यांनी म्हटलं की, ‘केवळ रायगड नव्हे, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. राज्य सरकारने तातडीने मदत देऊ करावी. या संकटामध्ये प्रत्येक कोकणवासीयांच्या पाठीमागे भाजपा भक्कमपणे उभा असेल. मदतीसाठी तातडीने एक समिती कोकणात रवाना करण्याचा दृष्टीने आज नियोजन केले आहे. कोरोना संसर्गाच्या काळामध्ये जसे मदतकार्य भाजपाच्यावतीने उभे केले आणि आज देखील ते सुरु आहे. तसेच आता कोकणात हे मदत कार्य केलं जाईल. लोकप्रतिनिधी, संपर्कप्रमुख यांना तालुकानिहाय जबाबदारींचे वाटप करण्यात येईल,’ असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.