3 पक्षांचे सरकार किती दिवस चालणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले, मात्र हे सरकार किती दिवस चालणार हे माहीत नाही. काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आहेत, हा मोठा विरोधाभास आहे. ठाकरे सरकार आंतविरोधाने भरलेले असल्यामुळे फार काळ टिकणार नाही, असा टोला महाराष्ट्र विकासआघाडी सरकारला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणाशी जमत नाही. ते कोठेही जाऊ शकतात. अद्याप मंत्रीपदाचे आणि खातेवाटव झालेले नाही. यावरून लक्षात येते आहे. तीन पक्षांचे सरकार किती दिवस चालणार, हा प्रश्नच आहे. देशात कुठेही असे सरकार आले नाही. त्यामुळे हे सरकार किती दिवस चालणार कोणीच सांगू शकत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंसोबत मैत्री कायम
भाजप-शिवसेना युती तुटली असली तरी माझी आणि उद्धव ठाकरे यांची मैत्री कायम आहे. मुलाखतीत बोलताना फडणवीस म्हणाले, त्या रात्री अजित पवार स्वत:हून भाजपकडे आले होते आणि शरद पवारांना हे माहित असल्याचे सांगितल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला. नाराज ओबीसी नेत्यांवर बोलताना फडणवीस म्हणाले, देशाचे पंतप्रधान स्वत: ओबीसी आहेत, त्यामुळे ओबीसी नेत्यांवर अन्याय होण्याचा प्रश्न नाही.

सरकारबाबत फडणवीसांचे ‘भाकीत’
ठाकरे सरकार अंतरविरोधाने भरलेले असल्यामुळे फार काळ टिकणार नाही, असे भाकीतही त्यांनी केले. काही कारणामुळे युतीचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. मात्र, आता जे तीन पक्ष एकत्र आले आहेत, ते कसे काम करणार हे आतापासून पहायला मिळत आहे. दरम्यान भाजप कधीही कोणाशीही डील करत नाही. जर आम्हाला डील करायचे होते तर आम्ही कोणत्याही पक्षाशी करून अडीच वर्षाच्या फॉर्म्युलावर सहमती दाखवली असती, पण आम्ही तसे केले नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

तर सरकारला धारेवर धरणार
राज्यात भाजप-शिवसेना युतीला जनमताचा कौल होता. मात्र, युतीचे सरकार येऊ शकले नाही. हा जनमताचा अपमान आहे. नवीन सरकार आले आहे. त्यांच्याकडून विकासकामांची अपेक्षा आहे. या सरकारला थोडा वेळ देणार आहे. जर त्यांनी त्यानंतरही कामे केली नाही तर त्यांना धारेवर धरले जाईल. ठाकरे आणि माझ्यात मैत्री आहे. मैत्री असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझ्या मैत्रीत कधीही दुरावा निर्णाण होणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

Visit : Policenama.com