युतीधर्म कसा पाळायचा; नितीश कुमारांकडून शिकण्याचा शिवसेनेला सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील युती तुटल्यानंतर भाजप आणि शिवसेना आमने-सामने आली आहे. रोज कोणत्याना कोणत्या कारणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकींवरूनही तोंडसुख घेतले होते. आता पुन्हा एकदा भाजपने शिवसेनेवर युतीधर्म कसा पाळायचा याबाबत टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युतीधर्म कसा पाळायचा, हे शिवसेनेने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून शिकावे, असा सल्ला शिवसेनेला दिला आहे. त्याचबरोबर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपची स्वबळावर सत्ता आणून दाखवू, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

फडणवीस म्हणाले, भाजपने नेहमीच दिलेला शब्द पाळला आहे. संयुक्त जनता दलाबरोबर युती असल्याने कोणाला कितीही जागा मिळाल्या तरी नितीश कुमार हे मुख्यमंत्री होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आम्ही शब्द पाळला आहे. महाराष्ट्रातही पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीआधी भाजपचा मुख्यमंत्री होईल, हे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सांगितले होते. त्यामुळे आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्याचा प्रश्नच नव्हता.

नितीश कुमार यांनी भाजपबरोबर सत्तेत असताना युतीधर्माचे पालन व आचरण कसे केले, हेही शिवसेनेने पाहिले पाहिजे. नितीश कुमारांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री वा भाजपबाबत काढले नाही. मात्र, शिवसेनेने सामना मुखपत्रातुन भाजपला टार्गेट केलेले आहे. अत्यंत खालच्या भाषेत नरेंद्र मोदी, अमित शहा तसेच भाजपवर टीका केली. सत्तेत राहून फळे चाखायची आणि भाजपला दूषणे द्यायची, हे शिवसेनेचे वर्तन अयोग्यच होते.

बिहारमध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा आल्या. मात्र, नितीश कुमारांनी ही परिस्थितीत मान्य केली. पण इकडे, सेनेने कमी उमेदवार निवडून आले म्हणून भाजपला दोषी धरले. युतीमध्ये सहकारी पक्षाबरोबर प्रेम, सौहार्द व जिव्हाळ्याचे संबंध राखले गेले पाहिजेत, एकमेकांबद्दल विश्वास हवा. नितीश कुमार यांनी तसे आचरण केले, असेही ते म्हणाले.

गेल्या महापालिका निवडणुकीत हातातोंडाशी आलेला घास गेला, त्यामुळे ती चूक यावेळी न करता आतापासूनच तयारीला सुरुवात केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. योग्य नियोजन, संघटनात्मक कामाची आखणी, प्रभागनिहाय लक्ष केंद्रित करून आणि प्रतिपक्षांचे बलाबल लक्षात घेऊन धोरण ठरविण्यात येत आहे. आमदार-खासदारांसह अन्य नेत्यांवर जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत.

‘त्या’ जमिनीप्रकरणी खुलासा करण्याची मागणी
रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यात अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कागदपत्रे उघड केली आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेपुढे खुलासा करावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.