भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपकडून कोणीही मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्यांची मागणी केलेली नाही, असे वरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मात्र, भाजप नेते नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुढच्या काही महिन्यांमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणूक असून याच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाकडून फडणवीस यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देणार आहे. सध्या बिहार सरकारकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन मुंबई पोलिसांवर निशाणा साधला जातोय. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भूमिका मांडलीय.

यावेळी फडणवीस म्हणाले, मला बिहार निवडणुकीत पक्षश्रेष्ठींकडून सहाय्य करण्यास सांगितले आहे. मात्र, सुशांत सिंह रजपूत प्रकरण आणि याचा काहीही संबंध नाही. महाराष्ट्र पोलिसांवर माझा विश्वास असून मी पाच वर्ष राज्याच्या पोलिसांबरोबर काम केलंय. त्यांची क्षमता मला माहित आहे. मात्र, अनेक वेळा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करत असल्यामुळे त्यामुळे पोलिसांनी राजकीय दडपणाखाली काम करु नये, अशी आमची अपेक्षा आहे. सुशांत सिंह रजपूत प्रकरण ‘सीबीआय’कडे पाठवण्याची मागणी झालीय. यात सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल. मात्र, महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांची तुलना होऊ शकत नाही. महाराष्ट्र पोलीस उत्तम आहेत, असेही फडणवीस म्हणाले,

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या टीकेवरुन राज्याच्या राजकारणातील घडामोडींना वेग आलाय. या विषयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पार्थ पवार यांचा विषय पवार कुटुंबियांचा अंतर्गत असून त्यात आम्हाला पडायचं नाही, असेही फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडीच्या कारभाराचं विश्लेषण करायची ही वेळ नाही. मात्र सरकारने कारभार नीट चालवावा. त्यांच्यात अंतर्गत मोठ्या प्रमाणात भांडण सुरु आहे. सरकारमध्ये नेमकं काय चाललंय हे कोणालाच कळत नाही. मात्र बदल्या संदर्भात अनाकलनीय सुरु आहे. जे ऐकायला मिळते ते भयंकर आहे. राज्याच्या डीजेने चुकीच्या बदल्या करायला लावल्यावर मी करणार नाही. वेळप्रसंगी मी नोकरी सोडतो, असं म्हटलंय हे अत्यंत गंभीर आहे, असं फडणवीस म्हणाले.

यावेळी फडणवीस यांनी कोरोना संकटावरही भाष्य केलं. कोरोना संकट सुरु होऊन पाच महिने झाले. आपण आता लसची वाट पाहतोय. कोरोनावर लस येईपर्यंत काळजी घ्यावी लागेल. पुण्यात पत्रकारांसाठी कोव्हिड सेंटरची निर्मिती केलीय. पत्रकार लॉकडाऊन काळात फिल्डवर काम करत होते. त्यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांना योग्य उपचार मिळावे हे महत्त्वाचं आहे, ते काम हे सेंटर करत आहे. महाराष्ट्र दुर्दैवानं कोरोनाची राजधानी झालीय. देशातील एकूण मृत्यूंपैकी 40 टक्के मृत्यू महाराष्ट्र राज्यात होतात, हे गंभीर आहे. मृत्यूदर आणि बाधा रोखली तर आपण यातून बाहेर पडू शकतो. कोरोना टेस्ट वाढवण्याची आवश्यकता आहे. आता टेस्ट वाढत असून आपण अँटिजन टेस्ट करत आहे. पण, त्याची विश्वासर्हता कमी आहे, त्यामुळे पीसीआरटी टेस्ट वाढवायला हवी, अशा सूचना देखील देवेंद्र फडणवीस यांनी केल्यात. कोरोना संकटाचा इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वृत्तपत्रांवर मोठा परिणाम झालाय. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेनुसार आपण आत्मनिर्भर बनू. आणि या कोरोनापासून स्वातंत्र्य मिळावं हीच शुभेच्छा, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.