फडणवीसांनी भाजपा अध्यक्षांना पत्र पाठवून जागे करावे, सतत महाराष्ट्राची बदनामी करु नये – माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  केंद्रातील मोदी सरकारने दुर्लक्ष केल्यामुळेच कोरोनाच्या साथीने देशभर थैमान घातलेले आहे याबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना पत्र पाठवून त्यांना जागे करा आणि सतत महाराष्ट्राची बदनामी करू नका, अशी प्रतिक्रिया माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांना देवेंद्र फडणवीस यांनी पाठविलेल्या पत्रावर व्यक्त केली आहे.

कोरोनाची पहिली अथवा दुसरी लाट असो, प्रत्येक वेळी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी आणि खासदार राहुलजी गांधी यांनी केंद्र सरकारला धोक्याची पूर्वकल्पना दिली होती आणि एवढेच नव्हे तर, सरकारला सहकार्यही देऊ केले होते. परंतु, त्याकडे मोदी यांनी सपशेल दुर्लक्ष केले. ते फक्त अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांचे स्वागत आणि निवडणूक प्रचार यातच दंग राहिले. सध्या तर उत्तर भारतात कोरोनाने प्रचंड थैमान घातले आहे. उत्तर प्रदेशात गंगा नदीच्या किनारी दोन हजार मृतदेह सरकारनेच गाडले अशी बातमी प्रतिष्ठित वृत्तपत्रांनी दिली आहे. हे सर्व मोदी सरकारची धोरणे चुकल्यानेच घडत असल्याचे अनेक संपादकांनीही म्हटले आहे. यांची जाणीव महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या अध्यक्षांना करुन द्यायला हवी, ढासळत्या स्थितीबद्दल त्यांना जागे करायला हवे असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

महाराष्ट्रातील सरकार कोरोना साथीचा मुकाबला आपल्या ताकदीने करत आहे. सर्वोच्च न्यायालयापासून विविध न्यायालयांनी महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीची प्रशंसा केलेली आहे. ज्येष्ठ राजकीय अभ्यासक रामचंद्र गुहा यांनीही महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून महाराष्ट्र सरकारची बदनामी कशी होईल हे देवेंद्र फडणवीस सतत बघत आहेत. यातून महाराष्ट्र सरकारची नव्हे तर महाराष्ट्र राज्याची बदनामी ते करीत आहेत. आपण एकेकाळी महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे याची जाणीव ठेऊन फडणवीसांनी ही बदनामी थांबवावी, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.