फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लोबोल, म्हणाले – ‘आतापर्यंतचं हे सर्वात गोंधळलेलं सरकार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रामध्ये आघाडीचे सरकार स्थापन होऊन तीन महिने होत आले. मात्र, अद्याप हे सरकार गोंधळलेले असून त्यांना सूर गवसला नाही. त्यांनी विरोधकांशी संवाद साधण्यासाठी चहापान ठेवलं पण या तीन पक्षांमध्येच विसंवाद असल्याची टीका विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज भाजपची बैठक पार पडली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस बोलत होते.

पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी, तूर आणि भात खरेदी, बाजार समिती निवडणुकीतून शेतकऱ्यांना दूर करणं अशा अनेक मुद्यावरून सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडीने एका अश्वासनची पुर्तता अद्याप केलेली नाही. हे सरकार घुमजाव करताना दिसत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असली तरी ती पूर्ण झालेली नाही. कोणत्याही कर्जमाफीची माफी झाली नाही. त्यामुळे याला सरसकट कर्जमाफी म्हणता येणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच आम्ही शेतकऱ्यांना मतदार केले मात्र आपली मक्तेदारी टिकवण्यासाठी तो निर्णय या सरकारने रद्द केल्याची टीका त्यांनी केली.
महिलांवर अत्याचाराबाबत संवेदनशिलता नाही

राज्यामध्ये महिलांवरील अत्याचार वाढत असून यावरून सरकारवर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले, महिलांवर वाढत्या अत्याचारावर सरकारचे नियंत्रण नाही. याबाबत त्यांची संवेदनशीलता दिसत नाही. कारण पोलिसांचे खच्चीकरण करण्याचे अनेक प्रकार सरकारकडून होताना दिसत आहेत. तसेच आमच्या काळातील अनेक योजनांना या सरकारने स्थगिती दिली. जलयुक्त शिवार यांसारख्या महत्त्वकांक्षी योजना जवळ जवळ गुंडाळल्या असल्याचे फडणवीस यांनी बोलून दाखवले.

सरकारला धमकी वजा इशारा
छत्रपती आणि त्यांच्या वंशजांचा अपमान झाला. यावर शिवसेना बोलण्यास तयार नाही. मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करायला पाहिजे अन्यथा किती दिवस असे सरकारमध्ये लाचारी पत्करणार असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केला जातोय. त्यांच्या मुखपत्रातून दर्जाहीन लिखान केले जात आहे. यावरदेखील मुख्यमंत्री काही करत नसतील तर भाजप काय करायचे ते नक्की करेल असा धमकी वजा इशारा फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला.