राज्याच्या इतिहासात इतके धमकावणारे CM कधी पाहिले नाहीत; फडणवीस यांची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सामनाला मुलाखत दिली. मुलाखतीत राज्यातील गरीब, कामगार, महिला, उद्योजक आणि शेतकऱ्यांबद्दल सरकारचं व्हिजन काय यासंदर्भात मुख्यमंत्री बोलतील असे वाटले होते. पण, हे सर्व सोडून मुख्यमंत्र्यांनी टीका केली. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाहीत, अशी सडकून टीका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. त्या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरे सरकारच्या कारभाराचा पाढा वाचण्यासाठी राज्यात पत्रकार परिषदेचे आयाेजन केले आहे. त्यानुसार फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. काेरोना संकट, वाढीव वीजबिल, शेतकऱ्यांना मदत या प्रश्नांवर फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सामनातील मुलाखतीवर फडणवीस यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो. मुख्यमंत्री संविधानाची शपथसुद्धा विसरले आहेत. खरे तर मुख्यमंत्र्यांची सामनामध्ये आलेली मुलाखत ही प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. भाजपचं हिंदुत्व बदलले नाही, शिवसेनेनं हिंदुत्व सोडले आहे. हिंदुत्वाबद्दल बोलताना धोतर सोडल्याची भाषा कसली करताहेत? असा सवाल करतच त्यांनी ‘ज्या पक्षाने वारंवार सावरकरांवर टीका केली आज त्या पक्षासोबत सत्तेत आहात, अशी टीकाही केली आहे.

राज्य सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या या कार्यकाळाची प्रगती पुस्तिका म्हणजे काल सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दिलेले दोन निकाल आहेत. सरकारी यंत्रणांचा मोठा गैरवापर केला गेला. हे दोन निकाल आल्यावर आता कुणावर कारवाई करणार हे आता स्पष्ट झाले पाहिजे. तसेच आता न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री माफी मागणार का? असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत. एका वर्षात हे सरकार अपयशी ठरले आहे. सरकारमधील तीन पक्षात कोणताही समन्वय नाही. विजेच्या प्रश्नावर त्यांनी घूमजाव केला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांची घोषणा केली. मात्र, यातील एक रुपयाचीही मदत अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे आधीच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलेल्या वचनाचे काय? असा सवाल फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. तसेच भाजपने मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेला वचन दिले होते. हे सेनेकडून सातत्याने सांगितले जाते. मात्र, शेतकऱ्यांना दिलेल वचन ते विसरले, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.