अर्णव गोस्वामी अन् कंगना प्रकरणावरून फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णव गोस्वामी यांची अटक व कंगना राणावत हिच्या कार्यालयावरील कारवाईच्या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (Leader of Opposition Devendra Fadnavis ) मंगळवारी (दि. 15) राज्य सरकारवर जोरदार टीका केली. खून करणाऱ्यास फाशी झालीच पाहिजे, चोरी करणाऱ्यास शिक्षा झालीच पाहिजे. पण हे पाकिस्तान नाही. इथे कायद्याचे राज्य आहे, ते कायद्यानेच चालवा, असा टोला फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना हाणला. सत्ता डोक्यात जाता कामा नये. राज्य कारभार कितीही काळ चालवा. 25 वर्षे चालवा. 27 वर्षे चालवा, पण कायद्याने चालवा असा चिमटाही त्यांनी काढला.

पुरवणी मागण्यांवरील चर्चेत (Discussion on Supplementary Demand) ते बोलत होते. राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. त्यासाठी त्यांनी गोस्वामी व कंगना प्रकरणाचा दाखला दिला. अर्णव गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जी वक्तव्ये केली, ती चुकीचीच आहेत. मी त्याचा निषेधच करतो. त्यांना असे बोलण्याचा अधिकार नाही.

याच गोस्वामी यांनी माझ्याही विरोधात ‘मीडिया ट्रायल’ एकदा नव्हे तर तीनदा चालवली होती. एकदा अमेरिकेत असताना माझ्या मागे कॅमेरे लावले होते. मी तिथे गुंतवणूकदारांची भेट घेत होतो आणि ह्यांचे कॅमेरे वेगळेच काम करत होते. पण म्हणून भारतात आल्यानंतर मी त्यांना जेलमध्ये टाकले नाही. त्यांना उत्तर दिल. हा फरक आहे, अस फडणवीस म्हणाले. अभिनेत्री कंगना राणावत हिच्या प्रकरणातील सरकारच्या भूमिकेलाही फडणवीसांनी आक्षेप घेतला. तुम्ही अब्रुनुकसानीचा खटला दाखल करू शकता. पण, मनात आल म्हणून तुम्ही कोणाच घर तोडू शकत नाही. हे पाकिस्तान नाही, असे फडणवीस यांनी यावेळी सुनावले आहे.