उध्दव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत, फडणवीसांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाचव्या क्रमांकावर असल्यासंदर्भातील आकडेवारी समोर आली होती. यावरच विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केले आहे. हे सर्वेक्षण पाहिले नसल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे. ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधण्याबरोबरच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरेंचा समावेश झाल्यासंदर्भातही भाष्य केले आहे.

उद्धव ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये समावेश झाला आहे यासंदर्भात तुमचे मत काय आहे असा प्रश्न फडणवीस यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आला. यावर उत्तर देताना हे कोणाचे सर्वेक्षण आहे मला माहिती नाही. मी तो बघितलेला नाही. पण कोणाला ते लोकप्रिय वाटत असतील तर चांगले आहे. महाराष्ट्र सरकारने कोवीडसंदर्भात चांगले काम केले पाहिजे एवढीच अपेक्षा आहे.

मुंबईतल्या लोकांना दिलासा मिळाला पाहिजे. मुंबईतल्या लोकांची आजची अवस्था अत्यंत वाईट आहे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होणार्‍या मुंबईमधील आरोग्य सेवांसंदर्भातील व्हिडिओंचा दाखला देत उद्धव यांना टोला लगावला. आपण सोशल मिडियावर जाऊन जर मुंबईची अवस्था बघितली तर कोण किती लोकप्रिय आहे हे आपल्या लक्षात येईल. माझ्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा आहेत, असे फडणवीस म्हणाले.

शिवसेना आमच्यासोबत पाच वर्षे सत्तेत होती तेव्हाही त्यांनी विरोधी पक्षाचेच काम केले आहे. रोज भूमिका बदलयाची हे त्यांचे धोरण होते. एक दिवस म्हणायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत. काही दिवसांनी मोदींवर टीका करायची. एकदा राज्यपालांना नावे ठेवायची, नंतर टीका करायची फक्त टीकेसाठी टीका करायची असे शिवसेनेचे धोरण आहे त्या टीकेला अर्थ, तत्त्व आणि मूल्य नाही, असा टोला फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.