ठाकरे सरकारमध्ये मलिद्यासाठी भांडण; फडणवीसांनी केला गंभीर आरोप

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप सरकारच्या काळात आदिवासी समाजासाठी मोठे काम करण्यात आले. समाजावरील 175 कोटींचे खावटी कर्ज माफ केले. पेसा अंतर्गत आदिवासी समाजाला थेट पद्धतीने अनुदान द्यायला सुरुवात केली. मात्र, आम्ही घेतलेले निर्णय ठाकरे सरकारने रद्द केले. हा अधिकार त्यांना कोणी दिला? या सरकारला फक्त खरेदीत रस आहे. थेट अनुदान नाकारून आदिवासी समाजासाठी वस्तू खरेदीचा घाट सरकारने घातला आहे. कोणाला किती मलिदा मिळेल, याचे भांडण सुरू आहे. त्यांच्या भांडणात आदिवासी समाज योजनांपासून वंचित राहत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

भाजपच्या अनुसूचित जमाती, आदिवासी मोर्चाच्या वतीने भोसरी येथे शुक्रवारी (दि. 22) अयोजित महाराष्ट्र प्रदेश कार्य समितीच्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते. यावेळी महापौर उषा ढोरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेश प्रभारी ओमप्रकाश धुर्वे, माजी मंत्री गिरीश महाजन, प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक, भाजपा प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय, प्रदेश सचिव अमित गोरखे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. अशोक ऊईके, खासदार डॉ. भारती पवार, खासदार अशोक नेते, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार आदी उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. सरकारमधील तीनही पक्ष तीन वेगवेगळ्या दिशेला चालले आहेत. त्यामुळे राज्याची अवस्था वाईट झाली आहे. सध्या सोफा एक आणि बसणारे तीन अशी राज्याची परिस्थिती आहे. त्यांना बसायलाच जागा नाही. मात्र, आपल्याकडे बसणारा एकच आहे. त्यामुळे आपल्याला बसायला खूप जागा आहे. आपल्याला भरपूर राजकीय जागा निर्माण झाली आहे, असे फडणवीस म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला मिळालेले घवघवीत यश हे बोलके आहे. 3 पक्ष एकत्र आले तरी सर्वांत मोठा पक्ष हा भाजपाच झाला. जनता आपल्यासोबत आहे, असे विधानही यावेळी फडणवीस यांनी केले.