शरद पवारांचे पत्र PM मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरते, रोहित पवारांचे फडणवीस यांना प्रत्युत्तर

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदतीवरुन राज्यातील सत्ताधारी आणि विरोधीपक्षात कलगीतुरा सुरु आहे. दरम्यान, शरद पवारांचे पत्र पंतप्रधान मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असते. त्यामुळे साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो,याचे आत्मपरीक्षण केले तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीसांनी राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधावा, असा टोला लगावला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन शेतकरी आणि बाराबलुतेदारांच्या प्रश्नांबाबतचे निवेदन सादर केले. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकाने देखील आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विविध मागणी करत आहे. त्यांनी एखादे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहून शेतकर्‍यांसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी करावी, असा टोला लगावला होता.

फडणवीसांच्या टीकेला रोहित पवारांनी ट्विटरद्वारे उत्तर दिले आहे. फडणवीसजी आरोप प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असून त्यावर महाविकासआघाडी सरकार व मुख्यमंत्री साहेब काम करतच आहेत. पण राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरू शकेल असे उत्तर दिले.