देवेंद्र फडणवीस जास्त काळ ‘माजी’ मुख्यमंत्री राहणार नाहीत, RSS चे सरकार्यवाह भय्याजी जोशींनी सांगितलं

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी नागपुर मधील साधना बँकेचा लोकार्पण सोहळ्यात म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत. तसंच त्यांना फार काळ माजी मुख्यमंत्रीही म्हणता येणार नाही. त्यांचे नशीब मोठे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भाग्यात विरोधी पक्षनेता हा जास्त दिवसांचा विषय नाही. तसेच माजी मुख्यमंत्रीपदही अल्पायु आहे. लोकशाहीत कमी अधिक घडत असते.” जोशी यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे जोशी यांनी जेव्हा वक्तव्या केले तेव्हा व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर जनमताचा कौल हा महायुतीलाच मिळाला होता. पण मुख्यमंत्री पदाचा वाद शिवसेना आणि भाजप यांच्यात विकोपाला गेला शेवटी दोन्ही पक्ष वेगळं झाले. अजित पवार यांची साथ घेऊन भाजपने सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. नंतर फडणवीसांची साथ अजित पवारांनी सोडली आणि फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. हे सरकार फक्त ७२ तास चालले होते. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन झाली.

महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. नंतर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते झाले. देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत. तसंच त्यांना फार काळ माजी मुख्यमंत्रीही म्हणता येणार नाही. असं भय्याजी जोशी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे मधल्या काळात दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. त्यानंतर स्वतःच देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाणार नसल्याचे सांगितले. मी मैदान सोडणाऱ्यांमधला नाही महाराष्ट्रातच राहणार, असं बोलत चर्चांना थांबवले. आता भय्याजी जोशी यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

You might also like