देवेंद्र फडणवीस यांचं CM उद्धव ठाकरे यांना पत्र, उपस्थित केला ‘हा’ महत्वाचा मुद्दा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अतिवृष्टीने विदर्भानंतर मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, सरकारकडून मदत करण्यास त्यांना उदासिनता दाखवली जात आहे, असे नमूद करत तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली.

यावर्षी चांगला मान्सून झाल्याने पेरणीक्षेत्रात वाढ होऊन चांगले पीक आले होते. पण, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने मराठवाड्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. तब्बल १८०० पेक्षा अधिक गावे यामुळे प्रभावित झाली असून, सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. काही तालुक्यातील नुकसान हे ७० टक्क्यांच्या वर आहे. काही शेतकऱ्यांनी माल शेतात काढून ठेवल्याने मुगाला तर शेतातच कोंब फुटले, असे फडणवीस यांनी पत्रात नमूद केलं.

मराठवाड्यातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी पूर्णरीत्या खचला आहे. त्यावेळी मंत्र्यांनी नुसते दौरे करायचे आणि पंचनाम्याचे आदेश देऊन मोकळे व्हायचे, असे करुन चालणार नाही. सरकारचे प्रमुख म्हणून प्रत्यक्ष जमिनीवरील स्थिती काय, पंचनामे होतात का नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आधीच कोरोनाचे संकट त्यात सतत येणारे अस्मानी संकट यामुळे शेतकरी मानसिकदृष्टया खचला आहे. अशावेळी सरकारने त्यांच्या पाठीशी उभा राहणे गरजेचे आहे. त्याला तातडीने मदत उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे फडणवीसांनी म्हटले.

पुढे पत्रात फडणवीस यांनी विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत म्हणाले, विदर्भात पूर आल्यानंतर सरकारकडून १६ कोटींची तोंडी मदत केली गेली. मात्र, त्यानंतर आता कोणतीही मदत केली जात नाही. विदर्भातील पुरग्रस्तांवर अन्याय केल्यानंतर आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाऊ नये, अशी अपेक्षा आहे. निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील पूर, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टी यामध्ये ठोस मदत सरकारने केली नाही. आता किमान मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तरी द्या, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.