‘कोरोना’च्या काळात महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना 14 पानी लेटर, लिहीलं – ‘पत्रास कारण की…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा प्रवास केल्यानंतर आढळलेली वस्तुस्थिती आणि त्यावर करायवयाच्या उपाययोजनांसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 14 पानांचे पत्र लिहले आहे. ज्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आरोग्य सुविधा आहेत, ती राज्येही महाराष्ट्राच्या तुलनेत चांगलं व्यवस्थापन करत असल्याची टीका फडणवीस यांनी या पत्रात केली आहे. राज्यात ढासळलेली आरोग्य व्यवस्था, स्थलांतरित मजुरांचा गंभीर प्रश्न, गरीब घटकांना कोणतीही मदत न मिळणे, लॉकडाऊन आणि अनलॉक बाबत सरकारची अवस्था सतत गोंधळल्यासारखी आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना आवश्यकता वाटली तर प्रत्यक्ष भेटून या सगळ्या विषयांवर चर्चा करण्याची फडणवीस यांनी तयारी दर्शवली आहे.

राज्यात काही जणांचे झालेले मृत्यू हे अन्य म्हणून दाखवण्यात आले आहेत. ICMRच्या निर्देशांनुसार ते मृत्यू कोरोना बळींच्या संख्येत दाखवण्यात यावेत, अशी मागणी फडणवीस यांनी आपल्या पत्रात केली आहे. तसेच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना येणाऱ्या काळात पुरेशा प्रमाणात बेड्स, ऑक्सिजन सिलिंडर्स, व्हेंटीलेटर्स यांची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
औषधांचा काळा बाजार होतोय

देशामध्ये प्रतिदशलक्ष चाचण्यांमध्ये 9 व्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. त्यामुळे चाचण्या जास्त म्हणून रुग्ण जास्त हा राज्यसरकारचा दावा चुकीचा आहे. राज्यात मनुष्यबळ कमी आहे. तसेच खासगी रुग्णालयांशीही आवश्यक तो समन्वय नसल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. राज्यात रुग्णवाहिका पुरेशा उपलब्ध नाहीत. अ‍ॅक्टमेरा आणि रेमडीसीवीर सारख्या औषधांचा काळा बाजार होत आहे. नॉन कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या बाबीकडे फडणवीस यांनी लक्ष्य वेधले आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता द्या
एमएमआर क्षेत्रातील जे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मुंबईत येतात त्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था मुंबईत करण्यात यावी. यामुळे त्यांच्या आवागमनामुळे कोरोना संसर्ग कमी होण्यास मदत मिळेल. त्यांना चांगली सुविधा व या कठीण काळात सेवा देत असल्याबद्दल प्रोत्साहनपर भत्ता द्यावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

कोविड योद्ध्यांना मोफत उपचार द्यावेत
डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस आदी कोविड योद्ध्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना उपचारासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी. त्यांच्यावर उपचारासाठी वणवण भटकण्याची पाळी येऊ नये. त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत. लोकप्रतिनिधी, समाजिक संस्थांचे प्रतिनिधी हे प्रत्यक्ष जनतेत जाऊन काम करीत असल्याने त्यांना जनतेच्या समस्या अधिक प्रमाणात कानावर येत असतात. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने त्यांना विश्वास घेऊन, समन्वयातून काम केले, तर या समस्येवर मात करणे अधिक सोपे होणार आहे. मात्र, सध्या त्याचा पूर्णत: अभाव दिसतो. त्यामुळे प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तवाचं प्रशासनाला नीट अकल होत नाही आणि त्याचा दुष्परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होतो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.