सरकार पाडण्याबाबत फडणवीसांचे मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर विरोधकांकडून सातत्याने निशाणा साधला जात आहे. संजय राठोड, अनिल देशमुख या मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील सरकार अस्थिर करणार असल्याची विधाने भाजपकडून सातत्याने केली जात होती. तसेच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा’ असे म्हटले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात दाखल झाले आहेत. एका सभेत बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार? त्याने काय सरकार बदलणार का? असे अनेकांना वाटत असेल. पण सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे. गेल्या दीड वर्षात या सरकारचे नाव बदलून महावसूली आघाडी नाव झाले आहे. जिथे जाऊ तिथे खाऊ अशी सरकारमधील मंत्र्यांची कामे आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, फडणवीसांच्या विधानानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘सत्ता बदलाबाबत पंढरपूरात जाऊन विधान केल्यामुळे प्रत्यक्ष विठोबा-माऊलीसुद्धा अत्यंत सावध झाली असेल. मात्र, विठु-माऊलीचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. विरोधी पक्षाला अशी भाषणे करावीच लागतात. यापूर्वी आम्हीही अशी भाषणे केलेली आहेत. त्यांचे आमदार एकत्र ठेवण्यासाठी, लोकांमध्ये उत्साह आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस तसे भाषण करत असतील’.

आवताडेंचा विजय निश्चित

भाजपने समाधान आवताडे यांना सामाजिक कार्याची आवड मेहनती, संघर्ष करणारा नेता असल्याने उमेदवारी दिली आहे. आता दामाजीच्या मागे पांडुरंग उभा असल्याने समाधान आवताडे यांचा विजय निश्चित आहे, असेही ते म्हणाले.