पवारसाहेब प्रॅक्टीकल, ते कधीही चुकीचा निर्णय करणार नाहीत : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मेट्रो कारशेड (Metro Carshed) आणि कांजूरमार्ग बाबत सविस्तर भाष्य करताना विरोधकांना प्रत्युत्तर दिले. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उद्धव ठाकरे यांना प्रतिप्रश्न केले आहे. तसेच संदर्भात शरद पवार हे जर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. कारण पवारसाहेब प्रॅक्टीकल आहेत, ते कधीही चुकीचा निर्णय करणार नाहीत, असे म्हणत त्यांनी मेट्रो प्रकल्पाचा चेंडू शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कोर्टात टाकला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्यावरून राज्याचे नुकसान होणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंना अहंकारी असल्याचे म्हटले होते. विरोधकांच्या या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. त्यानंतर फडणवीस यांनी पुन्हा एकदा ही श्रेयवादाची लढाई नसून लोकांची दिशाभूल कशाला करता ? असा सवाल उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. तसेच भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला ?असा प्रश्न फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारला आहे.

उचाधिकार समितीचा अहवाल सार्वजनिक करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्याच्या संवादातून असे जाणवते की महाविकास आघाडी सरकारच्या उच्चाधिकार समितीचा अहवाल त्यांनी पूर्णपणे वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीने सांगितले की, कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. तसेच 4 वर्षाचा विलंब लागेल तो वेगळा. कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असले तरी आरेमध्ये बांधकाम करावेच लागणार आहे हे लपवून का ठेवता ? असेही फडणवीसांनी म्हटले आहे.

शरद पवार प्रॅक्टिकल

मेट्रो प्रकल्पात आम्ही भावनिकदृष्ट्या जुडलेलो आहोत, मेट्रो होऊ नये असं कोणाचंच मत नाही. मी स्वत: मेहनत करुन 80 टक्के काम त्या काळात पूर्ण केलं आहे. त्यामुळेच पवार साहेब जर मोदींशी बोलून यासंदर्भात चर्चा करणार असतील, तर त्यांचं स्वागतच आहे. उद्धव ठाकरेंनीही मोदींशी चर्चा करावी. शरद पवार आणि आमचे कितीही वैचारिक मतभेद असले तरी, पवारसाहेब जेव्हा तो अहवाल वाचतील, तेव्हा ते प्रॅक्टीकल निर्णय घेतील, पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय करणार नाहीत, असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.