पहाटेच्या सरकारबाबत फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मागील वर्षी राज्यात सत्तास्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला होता. त्यावेळी भल्या पहाटे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी करत सर्वांनाच धक्का दिला होता. परंतु अगदी कमी कालावधीचे हे सरकार लगेच कोसळलेदेखील होते. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले असून, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे.

विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना, त्यांना पहाटेच्या शपथविधीबाबत विचारण्यात आले. त्यावेळी यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, आता ज्यावेळेस सरकार पाहायला मिळेल तेव्हा ते पहाटेचे सरकार पाहावे लागणार नाही, तर योग्य वेळेचे सरकार पाहायला मिळेल. दरम्यान, त्या अल्पकालीन सरकारबाबत एक पुस्तक लिहित असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर आणि विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले. यावेळी राज्यातील सरकार अजून चार वर्षे काय २० वर्षे चालेल या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांनी कितीही स्वप्नं पाहिली तरीदेखील त्यांना हे माहिती आहे की, जनतेने त्यांना निवडून दिलेले नव्हते. हे बेईमानीनं आलेलं सरकार आहे. त्यामुळे मी त्याबाबत अधिक काही बोलणार नाही.

मागील वर्षी पहाटे राजभवनात जात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे नक्की झाले होते. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. पण शरद पवारांच्या खेळीमुळे हे पहाटेचे सरकार अल्पजीवी ठरले होते. मात्र, या घटनेने महाराष्ट्राचे राजकारण बदलले होते. महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याच्या चर्चा असताना २३ नोव्हेंबरला सकाळी शपथविधी पार पडला. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, या सर्व गदारोळात शरद पवार यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या एकेका आमदाराला आपल्या गोटात आणण्यास सुरुवात केली.

दरम्यान, विरोधकांनी न्यायालयात धाव घेत याला विरोध केला. त्यानंतर फडणवीस यांना न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. परंतु त्याआधीच त्यांनी राजीनामा दिल्याने हे सरकार कोसळले.