उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेल्या आव्हानाला फडणवीसांचे प्रतिआव्हान, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आजपासून सुरु झालेल्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदावरून खडाजंगी होण्याची शक्यता असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणून दाखवा आम्ही तो वाजवून दाखवू असे आव्हान दिले होते. त्यानंतर पवारांच्या या आव्हानाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विधिमंडळाच्या कामकाजाबाबत घटनेने जी जबाबदारी दिली आहे. ती झटकायचे काम राज्य सरकारकडून सुरू आहे. राज्यपालांनी नियमानुसार अध्यक्षपदाची निवडणूक घ्या असा सल्ला दिला होता. मात्र सरकारने तो ऐकला नाही. दरम्यान, काल अजित पवारांनी केलेल्या विधानावरून त्यांच्या मनातील दिसून आली. पवारांना अध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांचेच आमदार, मंत्री विरोधात मदत करतील, अशी भीती वाटतेय, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी केलेल्या विधानाला काही अर्थ नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे पद रिक्त आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदारांना सभागृहात उपस्थित राहणे, आणि मतदान करणे शक्य नसल्याने यंदाच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची रिकामीच राहणार आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या वरळीतील पबमधील व्हिडीओंवरूनही फडणवीस यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. तसेच सरकारमधील अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतात. त्यामुळे ते स्वत:च सगळे निर्णय घेतात असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.