Nagpur News : असा काय गुन्हा होता तिचा, माणसातील सैतानाने बछड्यांनाही संपविले, बदला घेण्यासाठी टाकले विष

नागपूरः पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या मालकीच्या गायीला वाघाने मारले म्हणून बदला घेण्याच्या भावनेने त्यावर विष टाकून वाघीण व तिच्या तीन बछड्यांचा क्रूरपणे बळी घेण्याचा हा प्रकार उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात घडला आहे. कुणाच्याही मनाचा थरकाप उडावा अशी घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उघडकीस आली आहे. या कृतीमुळे आपण आईसह मुलांचीही घोर हत्या केल्याची भावनाही त्या निष्ठूर व्यक्तीच्या मनाला शिवली नाही, हे, दु:खदच. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गाय मालकास अटक केली आहे.

दिवाकर दत्तूजी नागेकर (40 रा. नवेगाव(साधू) ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कऱ्हांडला बिटात 1 जानेवारीला दुपारी वाघिणीसह दोन बछडे मृतावस्थेत आढळले होते. जवळच अर्धवट खाल्लेली गाय आढळली होती. त्यामुळे गाईच्या मृतेदावर विषप्रयोग केला असण्याची शक्यता व्यक्त होत होती. चौकशीसाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची चमू शनिवारी दाखल झाली. पुरावे गोळा करण्यासाठी संपूर्ण परिसर सील करून तपासणी केली. या दरम्यान जवळच्या झुडपात तिसरा बछडाही मृतावस्थेत आढळला. या घटनाक्रमात पुन्हा तिसरा बछडाही मृतावस्थेत सापडल्याचे कळताच वनविभागाच्या आणि वन्यजीवप्रेमींच्या मानवी संवेदना पुन्हा कळवळल्या आहेत.

वरिष्ठांच्या उपस्थितीत शवविच्छेदन
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे हेमंत कामडी, सीडब्ल्यूएलडब्ल्यूचे प्रतिनिधी रोहित करू, बोर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल गवई आणि डॉ. चेतन पाथोड आणि सय्यद बिलाल व डॉ. प्रमोद सपाटे यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृत वाघांना अग्नी देण्यात आला.