500 कोटीचा गैरव्यवहार करणारा 18 बनावट कंपन्याचा मालक गजाआड; मुंबई, पुणे, नाशिक अन् जळगाव येथे तपास सुरू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन –  बनावट कागदपत्राद्वारे तब्बल 18 कंपन्या चालविणा-या मास्टरमाइंडला जीएसटी महासंचालनालयातील गुप्तचर विभागाच्या नाशिक रिजन युनिटने अटक केली आहे. यामध्ये अन्य आरोपींचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आरोपीला अटक करून विशेष न्यायालयापुढे हजर केले असता त्याला 19 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या देशभरात बनावट देयकांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडीट मिळविणाऱ्यांवर छापेमारीची कारवाई सुरु आहे. या अंतर्गत नागपूर झोनल युनिटच्या अंतर्गत येणाऱ्या नाशिक रिजनल युनिटद्वारे मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव येथे तपास सुरू आहे. या दरम्यान काही कंपन्यांव्दारे खोटे इलेक्ट्रिक बिल, भाडेपट्टी कराराच्या आधारावर जीएसटीचे व्यवहार करत असल्याचे आढळले. या कंपन्यांनी जीएसटी पोर्टलवर केलेली नोंदणी देखील बनावट असल्याचे आढळून आले. या सर्वांचा मास्टरमाइंड जळगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जळगावातून आरोपीला अटक केली आहे. आरोपीने अठरा बनावट कंपन्यांचे संचलन करत असल्याची कबुली दिली. तसेच आतापर्यंत एकूण 500 कोटींचे खोटे व्यवहार दाखवून 46.50 कोटीइतका इनपुट टॅक्स क्रेडीट मिळविल्याची कबुली दिली. याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.