पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – DGP Maharashtra | निवडणुक आयोगाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना पोलीस महासंचालक (DGP) पदावरुन दूर केले असून तीन सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांची नावे सुचविण्यास सांगितले आहे. त्यानुसार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर ( Vivek Phansalkar) हे सर्वात वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्यानंतर संजय वर्मा (Sanjay Varma IPS) आणि रितेश कुमार (Ritesh Kumar IPS) हे सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत.
मुख्य सचिव हे तीन नावे निवडणुक आयोगाकडे पाठवतील. त्यानंतर त्यांच्यापैकी कोणाला पोलीस महासंचालक पदी नियुक्त करायचे हे निवडणुक आयोग निश्चित करणार आहे. उदया सायंकाळपर्यंत निवडणुक आयोग याची घोषणा करु शकतील. निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार रश्मी शुक्ला यांच्याकडील पोलीस महासंचालकाचा पदभार हा सर्वात वरिष्ठ विवेक फणसाळकर यांच्याकडे तातडीने सोपविण्यात आला आहे.
ही नियुक्ती महाराष्ट्रातील निवडणुका पार पडेपर्यंत असणार आहे. निवडणुका पार पडल्यानंतर निवडणुक आयोगाची भुमिका संपुष्टात येईल. त्यानंतर सत्तेवर येणारे नवीन सरकार हे पोलीस महासंचालकाबाबत निर्णय घेईल. महायुतीने रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जर महायुतीचे सरकार पुन्हा आले तर रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होऊ शकेल. जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर महायुतीचा निर्णय फिरविला जाण्याची शक्यता असून ते सरकार रश्मी शुक्ला यांना दिलेली मुदतवाढ रद्द करु शकते.