परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास DG संजय पांडे यांचा नकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांचा तपास करण्याची जबाबदारी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे दिली होती. मात्र आता पांडे यांनी परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे सरकारची कोंडी झाली असून आता चौकशीसाठी दुसरा अधिकारी नेमावा लागणार आहे.

१९८६ च्या बॅचचे संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. परमबीर सिंग यांची मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागली. तर संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. माझ्यापेक्षा एक दोन वर्ष लहान असणाऱ्यांना म्हणजे ज्युनिअर असलेल्या अधिकाऱ्यांना मोठी पदं दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुम्ही कार्यवाहक पोलीस महासंचालक बनवू शकत नाही. माझी फाईलच यूपीएससीला पाठवली नाही, हे सर्वच मी त्या पत्रात लिहिलं आहे.तसेच राज्य सरकारविरोधात मी न्यायालयात जाणार असल्याची ते म्हणाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले होते पत्र
संजय पांडे यांनी बदलीमुळे नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याआधी एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली होती. प्रत्येक वेळी क्षमता असतानाही आपल्याला साईडलाईन करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक पदावेळीही आपल्याला डावलल्याचे पत्रात म्हटले होते. परमबीर सिंग यांची मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगडी केल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यावेळी मला संधी न देता माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्याला ते पद देण्यात आले, अशी खंत व्यक्त करत परमबीर सिंग यांचे काम व्यवस्थित नसल्याचे संजय पांडे यांनी या पत्रात म्हंटले होते. आपल्याला एका प्रकरणाच्या तपासात सिंग यांनी सहकार्य न केल्याचेही संजय पांडे यांनी सांगितले होते.