महाराष्ट्राचा सन्मान : धामापूर तलावाला ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’चा दर्जा

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – जगातील ७४ हेरिटेज इरिगेशन साईट्सचा दर्जा जपानमधील ३५, पाकिस्तानमधील १ व श्रीलंका येथील २ साइट्स यांना आतापर्यंत मिळाला आहे. भारतातील तेलंगणातील दोन साइट्सना ही जागतिक ओळख मिळाली होती. यंदा आंध्र प्रदेशमधल्या तीन साइट्स आणि महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर तलावाला प्रथमच हा जागतिक सन्मान मिळाला आहे.

दिल्ली येथील सेंट्रल वॉटर कमिशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्यमंतक संस्थेचे संस्थापक सचिन देसाई यांना दूरध्वनी आणि ई मेलद्वारे तलावाबद्दलच्या या सन्मानाची माहिती दिली. स्यमंतक संस्थेतर्फे धामापूर तलावाचे तपशीलवार डॉक्युमेंटेशन सेंट्रल वॉटर कमिशनला सादर केले गेले होते. सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे ७१ व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये धामापूर तलावाला हा सन्मान दिला जाणार आहे.

दरम्यान, या सन्मानानंतर स्यमंतक संस्थेचे संस्थापक सचिन देसाई यांनी ‘मी धामापूर तलाव बोलत आहे’ ही डॉक्युमेंट्री रिलीज केली जाणार आहे, असे सांगितले.

पाच एकर परिसरात वसला तलाव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धामापूर हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. सदैव हिरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी, माड-पोफळीची झाडे आहेत. दुतर्फा डोंगराच्याच मधोमध हा ऐतिहासिक तलाव आहे. या तलावाच्या काठावर श्री भगवतीचे प्राचीन देवालय आहे. पाच एकर क्षेत्रात पसरलेल्या विस्तीर्ण तलावाचा जलाशय अत्यंत नितळ आणि स्वच्छ असून, नौकाविहार येथे उपलब्ध आहे.