धोमबलकवडी जलसिंचन योजना शेतकऱ्यांसाठी वरदान

भोर : पोलीसनामा ऑनलाईन (शुभम खोपडे) – शेतकऱ्यांच्या शेतीला नवसंजीवनी देण्यासाठी कोर्ले, टिटेघर, वडतुंबी उपसा सिंचन योजनेच्या सुमारे ३ कोटी ५० लक्ष रुपयांच्या प्रकल्पाचा उदघाटन समारंभ आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते आणि भोर तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे तसेच पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवळे, उद्योजक अनिल नाना सावले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. धोमबलकवडी धरणाअंतर्गत असलेल्या कार्ले, टिटेघर, वडतुंबी उपसा जलसिंचन योजनेमुळे ३०२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे काम पूर्ण झाल्यावर भविष्यात ही योजना तीन गावांना वरदान ठरणार आहे , असे आमदार थोपटे यावेळी म्हणाले. आमदार थोपटे यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा करून योजनेचे नवीन अंदाजपत्र करून निधी मंजूर करून आणला आहे.

आमदार थोपटे म्हणाले की, ‘माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी २००९-१० मध्ये ही योजना मंजूर करून शुभारंभ केला होता. मात्र निधीअभावी मागील दहा वर्षापासून योजना रखडली होती. या योजनेसाठी पाठपुराव्याने निधी मंजूर झाला आहे. २०१९ पर्यंत उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण करायचे असून या योजनेमुळे कोर्ले, टिटेघर, वडतुंबी गावातील ३०२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. बागायती शेतीमुळे या गावांतील तसेच आसपासच्या गावच्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत. प्रकल्पाचा जमिनीला फायदा होणार असून उन्हाळ्यात पाणी कमी पडल्यास या योजनेसाठी म्हाकोशी बंधाऱ्यातून पाणी उचलले जाणार आहे.’

यावेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सुभाष कोंढाळकर, मदन खुटवड, विद्यार्थी संघटनेचे भूषण खोपडे, पांडूरंग धोंडे, मारुती चिकणे (कोर्ले सरपंच ), छबन कांबळे (वडतुंबी सरपंच), शंकर तावरे (टिटेघर सरपंच) व टिटेघर, कार्यकारी अभियंता व्ही . बी. जाधव, ठेकेदार जे. एस. पाटील, अभिषेक येलगुडे, वडतुंबी, कोर्ले ग्रामस्थ तरुण वर्ग त्याच बरोबर पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर चिकणे यांनी केले.