धनगर समाजाचा एल्गार महामेळावा

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार महामेळाव्याचे आयोजन मंगळवारी बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथे करण्यात आले आहे.  या सरकारला आम्ही सत्तेवर बसवू शकतो तर सत्तेतून हाकलून देवू शकतो हा इशारा देण्यासाठी नांदेड जिल्हयातील सर्व समाज बांधवांनी एल्गार मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

भाजपाचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान भाजपा सत्तेवर आल्यानंतर पाहिल्या मंत्रमिंडळ बैठकीत धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करू असे अश्वासन दिले होते. त्यामुळेच धनगर समाजाने भाजपाला मोठ्या प्रमाणात मते देवून सत्तेवर बसवले. परंतु आता सरकार केंद्रकडे शिफारस करून वेळकाढूपणा करत आहे.

याच्या निषेधार्थ महाराष्ट्राचे धनगर नेते उत्तमराव जानकर व गोपीचंद पाडळकर यांनी महाराष्ट्रात भाजपाच्या आमदार, खासदार, मंत्री यांच्या मतदार संघामध्ये ९१ एल्गार महामेळाव्याचे आयोजन केले आहे त्यातलाच १७ वा महामेळावा चिटमोगरा येथे आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे राहणार आहेत. उदघाटक म्हणून उत्तमराव जानकर तर मार्गदर्शक म्हणून गोपीचंद पाडळकर, ॲड. शिवाजीराव हाके, प्रा. डॉ. यशपाल भिंगे राहतील.

जि. प. सदस्य माणिकराव लोहगावे, चंद्रसेन पाटील, दिलीप बंदखडके, विजय पाटील यांची उपस्थिती राहणार आहे एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकार वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे या सरकारला आम्ही सत्तेवर बसवू शकतो तर सत्तेतून हाकलून देवू शकतो हा इशारा देण्यासाठी नांदेड जिल्हयातील सर्व समाज बांधवांनी एल्गार मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन महेंद्र देमगुंडे, दिगांबर खटके, शाम मजगे, गंगाधर प्यादेकर, बालाजी नाईक, नागोराव शेंडगे, पंढरी जायनूरे, नवनाथ काकडे, बालाजी तुपेकर, गजानन सरोदे, जगदीश उराडे, गोविंद गोरे, टोपाजी काकडे आदींनी केले आहे.