राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धनंजय कुलकर्णी दोन वर्षांपासून करतोय शस्त्रविक्री

मुंबई ; पोलीसनामा ऑनलाईन- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपचा कार्यकर्ता धनंजय कुलकर्णी हा गेल्या दोन-अडीच वर्षांपासून शस्त्रांची विक्री करत होता,अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. या उद्योगासाठी त्याला कुणाचे पाठबळ होते, त्याला शस्त्रे कोण पुरवीत होते तसेच त्याने शस्त्रांची विक्री कोणाला केली, याचा पोलीस शोध घेत आहेत.

धनंजय कुलकर्णी याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. त्याच्या शोभेच्या वस्तूच्या दुकानांत सापडलेली शस्त्रे शोभेची असल्याचे त्याच्या समर्थकांकडून सांगण्यात येत होते. मात्र, ही सर्व प्राणघातक शस्त्रे आहेत,अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.  कल्याण सत्र न्यायालयाने धनंजयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या पक्ररणाचा अधिक तपास करणे आवश्यक असल्याने गुन्हे शाखेने गुरुवारी धनंजयला पोलीस तपासासाठी ताब्यात देण्याचे आदेश द्यावेत, या मागणीसाठी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर वरिष्ठ न्यायालयात अर्ज दाखल केला आहे,अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी दिली.

– गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

सुशिक्षित, सुसंस्कृत शहर म्हणून डोंबिवली ओळखली जाते. या शहरातील भाजपच्या एका कार्यकर्त्यांकडे अचंबित करणारा शस्त्रसाठा सापडतो हे निषेधार्ह आहे. ज्यांनी शहरवासीयांचे संरक्षण करायचे, आधार द्यायचा, तेच आता शस्त्र विकण्याचा व्यवसाय करीत असतील तर सामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा?

– महेश तपासे, प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस
डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्त्यांजवळ शस्त्रसाठा सापडल्याने, भाजपचे बोलायचे आणि खायचे दात कसे वेगळे आहेत हेच या माध्यमातून दिसून येते. एकीकडे धर्मनिरपेक्ष, सोज्वळतेच्या गप्पा मारायच्या आणि पडद्यामागून आपले मूळ धंदे सुरू ठेवायचे हीच भाजपची मानसिकता या प्रकारातून उघड झाली. या प्रकरणाची गुन्हे शाखेबरोबर दहशतवादी पथकाने चौकशी सुरू करावी. वातावरण खराब करण्याचे काम भाजपकडून कसे सुरू आहे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धनंजय कुलकर्णी आहे.