CM देवेंद्र फडणवीस आणि धनंजय महाडिक यांच्यांत भेट ; महाडिकांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रीया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे नेते धनंजय महाडिक यांनी भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली. त्यांच्या या भेटीच्या बातम्यांमुळे महाडिक भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आले होते. आता त्याबद्दल खुद्द महाडिक यांनी खुलासा केला.

याबाबत बोलताना महाडिक म्हणाले , ‘साखर कारखान्यांच्या कामासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. केंद्र सरकारकडून साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन दिलं जाणार आहे. पण काही कारखान्यांना या योजनेत स्थान देण्यात येणार नव्हतं. यासंदर्भातच मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. आजही अनेक कारखानदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. मी भाजपमध्ये जाणार ही अफवा आहे. भविष्यातही मी राष्ट्रवादीच राहणार आहे,’ अशी माहिती धनंजय महाडिक यांनी दिली आहे.

दरम्यान, धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत महाडिकांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात होतं. पण महाडिकांनी यामध्ये तथ्य नसल्याचे सांगितले आहे.