मंत्री धनंजय मुंडेंचे देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र, लिहीलं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सर्व पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यानंतर आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे. त्यामुळे, आतातरी मुख्यमंत्री निर्णय घेतील का, असा सवाल अनेक राज्यातील अनेक पत्रकार विचारत आहेत.

राज्यातील पत्रकार, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालून वार्तांकन करत आहेत. या सर्व माध्यम प्रतिनिधींना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे. दरम्यान फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशातील सुमारे 12 राज्यांत प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून जाहीर केले आहे. दुर्दैवाने, महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अद्यापही झाला नाही. कोरोनामुळे बळी पडलेल्या पत्रकारांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जिवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपसुकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल असे पत्रात म्हटले आहे. तसेच 2 दिवसापूर्वी राज्यातील पत्रकारांनीही या मागणीसाठी ऑनलाईन आंदोलन केले होते. विशेष म्हणजे, सोशल मीडियातूनही पत्रकार वारंवार सरकारला याबाबतचा निर्णय घेण्याची मागणी करत आहेत. मात्र, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे, मुख्यमंत्री पत्रकारांच्या आरोग्यासाठी कधी निर्णय घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.