Video : धनंजय मुंडेंच्या प्रकरणात शरद पवार यांनी नैतिकतेनं निर्णय घ्यावा – चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर विरोधकांकडून वारंवार त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते पुण्यात वार्ताहरांना बोलत होते.

“धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. अशा प्रकरणांत अनेक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. शरद पवार यांनी मुंडेंच्या प्रकरणात नैतिकतेने निर्णय घ्यावा,” असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

त्याचप्रमाणे धनंजय मुंडेवर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांचीही चौकशी करावी आणि त्यात काय खरे खोटं आढळलं तर कारवाई करा. याप्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्या वक्तव्यामध्ये कसलीही मतभिन्नता नाही, असेही पाटील यांनी नमूद केलं. मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोमवारपासून आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.