धनंजय मुंडे आणि ‘ती’ महिला मध्यस्थीच्या माध्यमातून वाद मिटवणार, दोन्ही बाजूंकडून मुंबई हाय कार्टात हमीपत्र सादर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेने आपासातील वाद मध्यस्थींच्यामार्फत सामंजस्याने सोडवण्यास तयार असल्याचे हमीपत्र गुरूवारी (दि. 28) मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे. या महिलेकडून मुंडेंना दोन मुल असून त्यांना त्यांच्या कुटुंबियांची मान्यता असल्याची जाहीर कबुली त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे दिली आहे. न्यायमूर्ती ए.के. मेनन यांच्यापुढे यावर सुनावणी झाली आहे.

दोन्ही बाजूंनी आपापसातला वाद मध्यस्थाच्या माध्यमातून सोडवण्यास तयारी असल्याचे हमीपत्र गुरुवारी हायकोर्टात सादर केले आहे. या मध्यस्थाचा सारा खर्च धनंजय मुंडे करणार असल्याचेही हमीपत्रात म्हटले आहे. डिसेंबर महिन्यात हा दावा मुंडे यांनी हायकोर्टात केल्यानंतर या महिलेच्या बहिणीने मुंडेवर बलात्काराचा आरोप लावत त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांत ही तक्रार मागे घेत असल्याचे पोलिसांना लेखी कळवले होते.

डिसेंबर 2020 मध्ये मुंडेंनी या महिलेविरोधात मानहानीचा दावा केला होता. सदर महिलेने तिचे व मुंडे यांचे काही खाजगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर जाहीर केले होते. याविरोधात मुंडेनी हायकोर्टात हा दावा केला होता. यात त्यांनी या महिलेकडून नुकसान भरपाईचीही मागणी केली होती. मात्र अंतरीम दिलासा मिळताना मुंडेनी नुकसान भरपाईची मागणी मागे घेत केवळ तीला भविष्यात अशा प्रकारच्या पोस्ट समाज माध्यमांवर करण्यापासून रोखण्याच निर्देश देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत हायकोर्टाने या महिलेला अशा प्रकारच्या पोस्ट करण्यास मनाई केली होती.