Exit Poll च्या विजयाचा जल्लोष झाला असेल तर दुष्काळाकडे पहा : धनंजय मुंडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांचे निकाल येत्या २३ तारखेला जाहीर होणार आहेत. अनेक माध्यमांनी एक्झिट पोल वरून निकालाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार जनतेचा कौल भाजपाकडे असल्याचे दिसून येत आहे. मात्र ‘आता एक्झिट पोलच्या विजयाचा जल्लोष झाला असेल तर आता दुष्काळाकडे वळा  ‘असा टोला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. याबाबतचे ट्विट धनंजय मुंडे केले आहे.

काय आहे ट्विट ?

एका इंग्रजी वृत्तवाहिनीचा दाखला देत धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हंटले आहे की, ” दुष्काळाच्या प्रश्नावर मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे. सरकार दुष्काळावर काय उपाययोजना करतंय हे तर स्पष्ट सांगतच नाही पण कोर्टात साधी हजेरीही लावत नाही. इतके गांभीर्य दाखवण्याची मानसिकताही सरकारमध्ये नाही. एग्झिट पोलच्या विजयाचा जल्लोष झाला असेल तर दुष्काळाकडे वळा…” असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

एक्झिट पोलच्या विजयाचा जल्लोष झाला असेल तर दुष्काळाकडे वळा असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. दुष्काळाच्या प्रश्नावरुन धनंजय मुंडे यांनी सरकारला धारेवर धरत टीका केली. दुष्काळाच्या प्रश्नावर गांभीर्य दाखवण्याची मानसिकताही सरकारमध्ये नाही अशी टीका त्यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही टीका केली आहे.

एक्झिट पोलचा भाजपला कौल

लोकसभा निवडणुकीतील सातही टप्प्यातील मतदान पूर्ण होताच एक्झिट पोल जाहीर झाले असून देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेवर येणार, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या जागा २०१४ पेक्षा वाढतील, असा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी पंतप्रधानपदावर विराजमान होण्याचे त्यांचे स्वप्न यंदा तरी पूर्ण होणार नाही, असे एक्झिट पोलमध्ये दिसते.