‘यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र या दोघांचा एक फोटो ट्विट केला आहे. त्याला कॅप्शन दिले आहे की, यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? आज व्हॅलेंटाइन डे आहे. प्रत्येकजण आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देत आहेत आपल्या भावना व्यक्त करत आहे. अशातच धनंजय मुंडे यांनी मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी मारली आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांना टोला लगावला आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच… केवढा तो एकमेकांवर जीव… नाही का ?’ ट्विटमध्ये त्यांनी व्हॅलेंटाइन डेचा हॅशटॅगही दिला आहे.

राज्यात जरी भाजप-शिवसेना युतीचं सरकार असलं तरी सत्तेत मात्र शिवसेनेने नेहमीच विरोधकांची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकदा विरोधी पक्षाची टीका एकवेळ उशीरा होईल. परंतु शिवसेना सर्वात आधी भाजपावर टीका करून मोकळी होते असे दिसते. इतकेच नाही तर, सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी शिवसेनेने अनेकवेळा दिली आहे. शिवसेनेच्या या धमकीला घेऊन विरोधी पक्षांनी अनेकदा टीकेचे आसूड ओढले आहेत. इतकेच नाही तर, हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडून दाखवा असं आव्हानही विरोधी पक्षांनी खूपदा केले आहे. इतके सगळे होत असतानाही युती मात्र कायम असल्याचे दिसत आहे. याच मुद्द्याला घेऊन धनंजय मुंडे यांनी शिवसेना-भाजपाला डिवचले आहे.