धनंजय मुंडे उद्या गाजवणार बेळगावात मैदान 

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाईन  – महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव येथे कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात होणाऱ्या जाहीर सभेत धनंजय मुंडे यांची मुलुख मैदानी तोफ गर्जणार आहे. या जाहीर सभेला राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक ,पेणचे शेकाप आमदार  धैर्यशील पाटील, आ. हसन मुश्रीप यांच्या सह कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य  नेते उपस्थित राहणार आहेत.

काय आहे बेळगाव मराठी भाषिक लढा  
१९५६ साली राज्य फेर रचना आयोगाचे विधेयक संसदेत सम्मत करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची कामगिरी या आयोगाकडे सोपवण्यात आली. आयोगाच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे भाषेने मराठी टक्का जास्त असताना देखील बेळगाव महाराष्ट्रात सहभागी होऊ शकला नाही. म्हणूनच १९६० साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून आज तागायत महाराष्ट्रात सहभाग मिळवण्यासाठी बेळगावच्या मराठी बांधवांचा लढा सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी बेळगावला दिलेला उपराजधानीचा दर्जा अमान्य केला असून येथे होणाऱ्या प्रत्येक हिवाळी अधिवेशनाला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने विरोध केला जातो. तसेच विरोधासाठी सभा हि घेतली जाते.

२००६ साली सुरु झाले बेळगावला  हिवाळी अधिवेशन
महाराष्ट्र शासनाने बेळगावचा लढा सर्वोच्च न्यायालयात नेऊन कर्नाटक राज्याची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. याला उतारा म्हणून कर्नाटक सरकारने बेळगावला अधिवेशन घेण्याचे ठरले आणि तेव्हापासून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्याला अधिक धार आली.

शिवसेनेने या लढ्याला पाठींबा दिला असून राष्ट्रवादीचे  सर्वेसर्वा शरद पवार यांनी बेळगाव मध्ये जाऊन बेळगाव मुक्ती साठी आंदोलन केले होते म्हणून राष्ट्रवादीचा हि पाठींबा या लढ्यास आहे. उद्या धनंजय मुंडे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या  व्यासपीठावर जाऊन कर्नाटक सरकारला कसे खडे बोल सुनावणार याकडे सर्व बेळगावच्या लोकांचे लक्ष लागले आहे.  तर धनंजय मुंडे यांच्या येण्याने या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. बेळगाव ध्ये सुरक्षतेसाठी मोठा फौजफाटा उभारण्यात आला असून अधिवेशन असल्याने तसेच महाराष्ट्र्र एकीकरण समितीच्या आंदोलनामुळे बेळगावला छावणीचे स्वरूप आले आहे.