धनंजय मुंडेंचे समर्थकांना आवाहन, म्हणाले – ‘मी बरा आहे…अन्नत्याग, नवस-पायी वार्‍या करू नका’

पोलिसनामा ऑनलाईन – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती सुधारावी आणि ते लवकर बरे व्हावे यासाठी त्यांचे काही समर्थक उपवास करत आहेत. नवस-पायी वार्‍या करत आहेत, तर कोणी मुंबईकडे येण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा समर्थकांना धनंजय मुंडे यांनी, मित्रांनो, मी बरा आहे काळजी करू नका. कसलाही त्रास करून घेऊ नका. तुमचे आशीर्वाद, प्रेम माझ्यापर्यंत पोहोचते आहे. त्यामुळे अन्नत्याग, पायपीट, नवस असे स्वतःला इजा करणारे कृत्य करू नका ही कळकळीची विनंती. तुम्हाला होणारा त्रास हा मला वेदना देणारा आहे, असे आवाहन त्यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.

मुंडे यांनी फेसबुकवर , मी लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून माझ्यावर प्रेम करणार्‍या आपल्यातील काही जणांकडून विविध प्रकारे प्रार्थना केल्या जात आहेत, काहीजण उपवास करत आहेत, काहीजण नवस-पायी वार्‍या करत आहेत, कोणी मुंबईकडे येण्याचा प्रयत्न करीत आहेत; तुम्हा सर्वांचे माझ्यावरील ऋण वाढतच जात आहेत! पण सहकार्‍यांनो, असे काहीही करू नका. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा-आशीर्वादाने मी ठणठणीत बरा होऊन येणार आहे. कोणीही पायी चालत जाणे, उपवास करणे असे काहीही करू नका. माझ्यावर प्रेम करणार्‍या कोणालाही त्रास झालेला मला कसा बरा वाटेल? आपण सर्वांनी आहेत त्या ठिकाणी राहून स्वतःचे व कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करावे, एकमेकांची काळजी घ्यावी, हेच माझ्यासाठी सदिच्छा व प्रार्थनांचं काम करतील. अशी पोस्ट शेअर केली आहे.