भुजबळ सरकार विरोधात बोलतात म्हणून त्यांची सुरक्षा कमी केली- धनंजय मुंडे

नाशिक : पोलीसनामा – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ राज्य सरकारच्या चुकीच्या कामकाजाविरोधात बोलतात, म्हणून त्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली आहे का?, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संकल्प यात्रेदरम्यान ते बोलत होते. आज राष्ट्रवादीची संकल्प यात्रा नाशिकमध्ये पोहचली आहे.

छगन भुजबळ सरकारवर टीका करतात. म्हणून राज्य सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली आहे का ?  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची सुरक्षा अचानक कमी करण्यात आली आहे. सरकारने हा निर्णय कोणत्या हेतुने घेतला हे कळत नाही. मात्र, हे अयोग्य आहे. त्याविरोधात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

छगन भुजबळ हे राज्याचे मोठे नेते आहेत. ते सातत्याने राज्य आणि जनतेच्या हिताची भूमिका मांडतात. जेथे सरकारचे चुकते तिथे सरकारवर टिका करतात. ही भूमिका ते सातत्याने मांडतात. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्याबाबत हा निर्णय घेतला आहे की काय, अशी शंका येते. निवडणुका तोंडावर असताना हा निर्णय झाल्याने त्यात काही कट तर नाही ना? असे गलीच्छ राजकारण करु नका. हा विषय शासनाने गांभिर्याने घ्यावा, असं धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेविषयीही मुंडेंनी काल आपल्या अकाऊंटवरून ट्वीट केले आहे. त्यांची सुरक्षा अचानक कमी केल्याने मुंडेंनी हे ट्वीट केले आहे. आव्हाड हिटलीस्टवर असल्याची माहिती सरकारला दिलेली आहे. असे असताना त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत असा निर्णय योग्य आहे का? सरकारने त्वरीत त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करावी, असं ट्वीटही त्यांनी केले होते.