‘धनंजय मुंडेंनी दुसर्‍या विवाहाची माहिती लपवली’, भाजपाच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याची थेट EC कडे लेखी तक्रार

पोलिसनामा ऑनलाईन टीम : किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे थेट लेखी तक्रारच केली आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या तक्रारीवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दुसऱ्या विवाहाचं प्रकरण राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या चांगलंच अंगलट येण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या दुसऱ्या विवाहाची माहिती लपविल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात पाच अतिशय महत्वाचे मुद्दे नमूद करत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत.

पत्रात आहेत हे मुद्दे

“धनंजय मुंडे यांनी दुसरं लग्न केल्याचं सार्वजनिकरित्या मान्य केलं आहे. दुसऱ्या पत्नीची आणि त्यांच्या मुलांची काळजी घेत असल्याचंही त्यांनी कबुल केलं आहे. याशिवाय, त्यांची दुसरी पत्नी असलेल्या रेणू शर्मा मुंबई पोलिसांकडे मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार देखील केली आहे”, असं किरीट सोमय्या यांनी पत्रात नमूद केलं आहे. धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्यासाठी मुंबईत फ्लॅट घेऊन दिल्याचंही मान्य केलंय. शिवाय रेणू शर्मा यांच्या मुलांना आपलं नाव दिल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे. पण ऑक्टोबर २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी धनंयज मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली होती. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन आपण योग्य ती कारवाई करावी, असं किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

धनंजय मुंडे याचं स्पष्टीकरण

२०१९ पासून करूणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याबाबत आणि धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. या बाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी मी २०१९ पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर (सोशल मीडिया) माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे. या याचिकेत उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत.

सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही असे मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.