विद्यार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये आठवड्याभरात पैसे जमा होणार, धनंजय मुंडेंची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्याना देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा 35 कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून वितरित करण्यात आला आहे. आठवड्याभरात हे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

दहावीच्या पुढील उच्च शिक्षणासाठी वाढलेली स्पर्धा लक्षात घेत शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळू शकलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत त्यांचा मासिक खर्च भागवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत वसतीगृह सानुग्रह अनुदान देण्यात येते. चालू शैक्षणिक वर्षात (2020-21) या योजनेसाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात आल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

पुर्वी या योजनेची व्याप्ती ही महानगरांपुरतीच मर्यादित होती. मात्र आता ती महानगरांपुरतीच मर्यादित न ठेवता, ती वाढवून तालुकास्तरावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची बाकी असलेली देयके देण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करु देण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने या निधीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आग्रह धरला. त्यानुसार हा निधी उपलब्ध झाला असल्याने विद्यार्थ्यांना निश्चितच दिलासा मिळाला असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.