शरद पवारांचे ‘ते’ विधान अन् चर्चेला उधाण, मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या एका गायिका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. यामुळे ते अडचणीत आले आहेत. मुंडे यांच्याबद्दलची भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली आहे. मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी माझ्याकडे सविस्तर माहिती दिली आहे. आता पक्षातील वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलून याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. पवारांच्या विधानामुळे चर्चेला उधाण आले असून पक्षाकडून मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या राष्ट्रवादीचे दोन मंत्री अडचणीत सापडले आहेत. मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले असताना नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीकडून अटक झाली आहे. या दोन्ही प्रकरणांवर पवार यांनी भाष्य केले आहे. मात्र दोन्ही मंत्र्यांबद्दल बोलताना पवार यांनी घेतलेली भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. मलिक यांच्या जावयावर आरोप झाले आहेत. मलिक यांच्यावर व्यक्तिगत स्वरुपाचे कोणतेही आरोप नाहीत. त्यांच्या जावयावर झालेल्या आरोपासंबंधांत संबंधित यंत्रणेकडून कारवाई सुरू आहे, असं म्हणत पवार यांनी मलिक यांना अप्रत्यक्षपणे क्लीन चीट दिली आहे.

तर शरद पवारांनी मुंडेंवरील आरोप मात्र गंभीर स्वरुपाचे असल्याचे म्हटले आहे. मुंडे यांनी याबद्दल मला माहिती दिली आहे. पण माझं याविषयी पक्षातल्या प्रमुख सहकाऱ्यांशी बोलण झाले नाही. त्यांच्याशी संवाद साधून, विचारविनिमय झाल्यानंतर पक्ष मुंडे यांच्यासंदर्भात निर्णय घेईल. मुंडेवरील आरोपांबद्दल, विरोधकांकडून होत असलेल्या राजीनाम्याच्या मागणीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी काही बोलणे झाले का, असा प्रश्न पवार यांनी विचारण्यात आला. त्यावर आधी पक्षातल्या वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलू, मग मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू, असे उत्तर त्यांनी दिले. याप्रकरणी निर्णय घेताना आम्ही मुख्यमंत्र्यांची वाट पाहणार नाही. पक्ष योग्य तो निर्णय घेईल. मात्र तो घेताना कोणावरही अन्याय होणार नाही आणि आरोपाचे गांभीर्य कमी होणार नाही, या गोष्टी लक्षात घेऊ, असे पवार म्हणाले.