‘पंकजाताईंच्या घराणेशाही’बाबत धनंजय मुंडेंनी केलं ‘हे’ वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाकेबाज नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुडें यांनी बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडेंच्या घराणेशाहीवर बोचरी टीका करत प्रहार केला आहे. बीड जिल्ह्याचं राजकारण म्हणजे एकाच घरात सत्ता असून एक बहीण आमदार, एक बहीण खासदार आणि एक बहिण पालकंमत्री असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे. धनंजय यांनी पंकजांच्या नेतृत्वावर टीका केली आहे. बीड जिल्ह्याचं राजकारण म्हणजे एका कुटुंबाची मक्तेदारी आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला. एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, “बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपापेक्षा मोठ्या प्रमाणात मजबूत आहे. तेथील नगरपरिषद, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमधून हे स्पष्ट होत आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकांवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते मुंडेसाहेबांचे निधन झालं, त्यामुळे सहानभूतीचं वातावरण होत. या लाटेमुळे भाजपाचे 7 आमदार निवडून आले, तर एक जागा राष्ट्रवादीला मिळाली” असे ते म्हणाले.

धनंजय मुंडे भाजपा नेतृत्त्वावर टीका करताना म्हणाले की, “गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता एका कुटुंबाकडं. एक बहिण आमदार, एक बहिण खासदार, एक बहिण पालकमंत्री.. संबंध सत्ता तुमच्याकडं. जिल्हा परिषद तुमच्याकडे, जिल्हा मध्यवर्ती बँक तुमच्याकडं पण तुम्ही काय केलं ?  आजही आमच्या बीड जिल्ह्यावरील ऊसतोड मजुरांचा जिल्हा हा कलंक आम्ही पुसू शकलो नाहीत. एक सिंचनाचा नवीन प्रकल्प यांनी सुरू केला का, जलयुक्त केलं तेही फक्त कार्यकर्ते पोसायला” असे ते म्हणाले.

इतकेच नाही तर, महाराष्ट्रात आज सर्वाधिक दुष्काळाच्या झळा बीड जिल्ह्यात आहेत. तुम्हाला ऑगस्टमध्ये मंत्री म्हणून पाठवलं, पण बीडवासियांना काय मिळालं असा सवाल उपस्थित करत धनंजय मुंडेंनी भाजपा नेत्या आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडेवर निशाणा साधला.

सदर मुलाखतीत धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याचं राजकारण, अमोल पालेकरांचं भाषण, शरद पवारांची लोकसभा, राष्ट्रवादीची दुसऱ्या फळीची भूमिका यांसह विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केल्याचे दिसून आले.