धनंजय मुंडेंची ‘कोरोना’वर मात, मिळू शकतो लवकरच ‘डिस्चार्ज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना कोरोना संसर्गाची लागण झाली होती. बीडहून मुंबईत आल्यानंतर त्रास जाणवू लागल्याने त्यांची कोरोना संसर्ग चाचणी करण्यात आली होती. तो चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच बीडमधील धनंजय मुंडे समर्थक थोडे काळजीत पडले होते. पण धनंजय मुंडे यांनी कोरोना संसर्गावर मात केली असून, त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून, संसर्गाची कोणतेही लक्षण त्यांच्यात दिसत नाही. फक्त श्वसनाचा किंचित त्रास जाणवत असल्यानं त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येत असून, काळजीच कारण नसल्याचं याआधीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होत. त्यानंतर मुंडेंना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथेच त्यांच्यावरती उपचार सुरु होते. दरम्यान, त्यांनी कोरोना संसर्गावरती मात केली असून सायंकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती मिळतं आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा एक चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. पण दुसरा अहवाल हा पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याच्या संपर्कात आल्यामुळे बीडचे जिल्हाधिकारी, अंबेजोगाई मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांच्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. मात्र, त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. पण धनंजय मुंडे यांचा मुंबईतील चालक, बीडचा स्वयंपाकी, वाहनचालक अशा ५ जणांना कोरोना संसर्गाची लागण झाली होती. त्यामुळे मुंडे यांच्या संपर्कातील व्यक्तींना देखील क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान, धनंजय मुंडे हे कोरोना संसर्गाची लागण होऊन बरे झालेले तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण यांना या संसर्गाची लागण झाली होती. तसेच त्यांनी या संसर्गावर मात केली होती. त्यानंतर आता, धनंजय मुंडे सुद्धा कोरोना संसर्गावर मात करुन रुग्णालयातून बाहेर येत आहेत. त्यामुळे मुंडे समर्थकांसाठी ही आनंदाची बातमी असून परळीकरांना या वृत्ताने मोठा दिलासा मिळाला आहे.