भाजपाच्या चित्रा वाघ यांनी घेतली सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट, केली ‘ही’ मागणी

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शनिवारी (दि. 23) मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. तसेच हे प्रकरण मुंडे – रेणू शर्मापुरते मर्यादित नसून यात योग्य कारवाई झाली नाही, तर याचे दूरगामी परिणाम राज्यातील लेकी-बाळींना भोगावे लागतील. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा या महिलेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. मात्र अचानक हा आरोप तिने मागे घेतला. या प्रकारानंतर चित्रा वाघ या आक्रमक झाल्या असून त्यांनी विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन रेणू शर्मावर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

रेणू शर्मा हिने बलात्कारासारखा गंभीर आरोप करुन नंतर तक्रार मागे घेतल्यामुळे खऱ्या पीडितांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल. अशा परिस्थितीत खोटे आरोप केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रेणू शर्मांवर तात्काळ कारवाई करायला हवी. खोटे आरोप करणे, खोटे गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे. खोट्या आरोपांमुळे राजकीय कार्यकर्ता असू दे किंवा सामान्य माणूस असू दे, तो उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खोटे आरोप लावणाऱ्या रेणू शर्मावर तात्काळ कारवाई करावी, असे मत चित्रा वाघ यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्टद्वारे आधीच केली होती.