बीड : आमच्या बहिणाबाईचं कर्तृत्व काय : धनंजय मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीडमध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. बिडमध्ये उमेदवार बजरंग सोनवणे हे आहेत. सोनवणे यांच्या प्रचाराची धुरा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर आहे. बहीण प्रितम मुंडे यांना टक्कर देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

धनंजय मुंडे यांनी आज प्रचाराला सुरुवात केली आहे. पहाटे पाच वाजता घराबाहेर पडून मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांसोबत धनंजय मुंडेंनी थेट संवाद साधला. तसंच तेथील लोकांना गोळा करून तेथेच छोटी सभाही घेतली. निव्वळ सहानुभूतीच्या जोरावर निवडून आलेल्या आमच्या बहिणाबाईचं कर्तृत्व काय, असा सवाल करत मला एकदा संधी द्या, असं म्हणत नागरिकांना मुंडेंनी भावनिक साद घातली.

भाजपचा उमेदवार सक्षम नाही. त्यांचा राजकाराणाशी संबंध नाही. मुंडे साहेबांचं निधन झाल्यावर राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला नाही, त्यावेळी त्या निवडणुकीस उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या. त्यांचा आणि राजकारणाचा काहीच संबंध नाही. मुंडे साहेबांचं निधन झाल्यावर रिकाम्या झालेल्या जागेवर त्या राजकारणात आल्या. त्यापूर्वी त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. त्यांना खरीप काय आणि रब्बी काय माहित नाही, शहरातील प्रश्न काय आणि खेड्यातील प्रश्न काय याची जाण नाही. म्हणून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, असं मुंडे यांनी म्हटलं. फक्त वडिलांचं नाव घ्यायचं आणि मत मागायचं, लोकांना भावनिक करायचं, आता या सर्व गोष्टीला लोक वैतागले आहेत.

विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे. सामान्य जनतेची भावना आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत प्रितम मुंडे या देशात सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा प्रितम मुंडे लोकसभा लढवणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या उमेदवारीचा अर्ज सोमवारी दाखल करणार असल्याची माहितीही मुंडेंनी यावेळी दिली.