शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी जमीन विकण्यापेक्षा घोटाळ्यातले पैसे वापरा ; धनंजय मुंडेंची पंकजांवर जहरी टीका
वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभांच्या प्रचाराचा धुराळा उडाला तसा आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरु झाल्या. राजकारणातले कट्टर विरोधक आणि नात्याने बहिण भाऊ असणारे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यात वाद दिसून येतात. धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा पंकजा मुंडेंवर टीका केली आहे. शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्कीत खाल्लेले पैसे दिले तर बरं होईल, असा टोला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी लगावला आहे. वर्ध्यात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
पंकजा मुंडेंवर टीका करताना धनंजय मुंडे यांनी आपले मत व्यक्त केले. मुंडे साहेबांचा वारस मी कधीच समजलं नाही. ते पंकजाताईनेच सांभाळावे. त्याचा त्यांनाच लखलाभ, असं त्यांनी म्हटलं.
विरोधी पक्षनेता तोडपाणी करणारा असता तर सरकारचे घोटाळे बाहेर काढले नसते, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावाला. तसंच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये आहात तेव्हा चौकशी समिती नेमावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं
दरम्यान, या प्रचारसभेत धनंजय मुंडेंनी फक्त पंकजा मुंडेंवरच टीका केली नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह सरकारवही टीका केली.