धनंजय मुंडेंच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा

पाथर्डी (अहमदनगर) : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचेबद्दल अश्‍लील शब्दात टीका केल्याबद्दल पाथर्डी शहर व तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत पोलिस स्टेशनवर निषेध मोर्चा काढला. धनंजय मुंडे यांच्यावर पाथर्डीत गुन्हा दाखल करावा व त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

आमदार मोनिका राजळे, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, महिला आघाडीच्या काशीबाई गोल्हार, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, दिपाली बंग, रामनाथ बंग, धनंजय बडे, ज्योती मंत्री, मनीषा घुले, सुरेखा गोरे, मंगल कोकाटे, डॉ. शारदा गर्जे, सुलभा बोरुडे, विष्णुपंत अकोलकर, सुभाष केकाण, सुनिल ओव्हळ, गोकुळ दौंड, उत्तम गर्जे, आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.

धनंजय मुंडे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना आमदार राजळे म्हणाल्या की, बहीण-भावाच्या पवित्र नात्याला अशा वक्तव्याने कलंक लागला असून जबाबदार लोकप्रतिनिधी अशा पद्धतीचे वक्तव्य करणे अत्यंत बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. लोकनेत्या पंकजा मुंडे राज्याच्या नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे नंतर सर्व कार्यकर्ते त्या जागेवर पंकजाताईकडे पाहतात. सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांविषयी अशा पद्धतीने वक्तव्य केल्याने सर्व महिलांचा अपमान झाला आहे. त्यांचे वर योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा. बदनामी झाल्याने धनंजय मुंडे यांचे विरोध आचारसंहिता भंगाचा सुद्धा गुन्हा दाखल व्हावा.

यावेळी बोलताना महिला आघाडीच्या काशीबाई गोल्हार म्हणाल्या धनंजय मुंडे यांचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. स्त्रीशक्तीची ताकद त्यांना दाखवून अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही. महिला वर्गाचा घोर अवमान केला आहे. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घ्यावा, या मागणीसाठी कार्यकर्ते व पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्यामध्ये चर्चा झाली.

visit : Policenama.com