राज्यातील ‘या’ दिग्गज मंत्र्यासह 5 जणांना ‘कोरोना’ची लागण

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस नेते आशोक चव्हाण यांच्यानंतर अजूनही राज्यातील राजकीय क्षेत्रातील कोरोनाचा शिरकाव कमी झाल्याचे दिसत नाही. कारण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह 5 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाचजणांमध्ये मुंडे यांच्यासह त्यांचे 2 स्वीयसहायक, मुंबईतील 1 वाहन चालक, बीडचा 1 स्वयंपाकी आणि बीडचा 1 वाहनचालक अशा 5 जणांचा समावेश आहे.

धनंजय मुंडे आणि त्यांच्या सोबतच्या सर्वांची काल मुंबईत आल्यानंतर कोरोना चाचणी केली असता ते सर्वजण पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. या चाचणीचे रिपोर्ट काल रात्री आले. सोमवारी बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे अंबाजोगाई येथे धनंजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते. मुंडे आणि त्यांच्या सोबतच्या व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. तरीही ते पॉझिटीव्ह असल्याचे आढळले आहे. मुंडे यांच्यावर कुठे उपचार सुरू आहेत, हे अद्याप समलेले नाही.

महाआघाडी सरकारमध्ये सर्वप्रथम गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यानंतर काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. हे दोघेही उपचारानंतर बरे झाले आहेत. आता राज्यातील महाविकास आघाडीमधील तिसरे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे कोरोना पॉझिटीव्ह आढले आहेत.

बीड जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आवाहन केले आहे की, पालकमंत्री धनंजय मुंडे, त्यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे पी. ए. यांच्या संपर्कात मागील चार दिवसांत जे कुणी आले असतील किंवा कागदपत्रांची देवाणघेवाण केली असेल त्यांनी संपूर्ण कुटुंबासह 28 दिवस होम क्वारंटाइन व्हावे. तसेच स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यावी. यादरम्यान कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ नजीकच्या शासकीय आरोग्य रुग्णालयात जावे.