हेलिकाॅप्टर दुर्घटनेतील ‘त्या’ शहीदाच्या कुटुंबीयांना धनंजय मुंडेंची आर्थिक मदत 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – जम्मू-काश्मीरच्या भारत-पाक सीमेवर सुरु असणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत लढाऊ हेलिकाॅप्टरद्वारे सीमेवर टेहाळणी करत असताना हेलिकाॅप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे (वय 33) यांना वीरमरण आले होते. दरम्यान मांडवगणे यांच्या कुटुंबीयांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांना मिळालेल्या आदर्श आमदार पुरस्काराच्या रकमेसह 1 लाख 2 हजार रुपयांची मदत केली आहे. आणि आपण या कुटुंबाच्या पाठीशी सदैव राहू असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर मांडवगणे कुटुंबीयांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी मांडवगणे कुटुंबीयांना केलेल्या मदतीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे म्हणतात की, “जम्मू-काश्मीरमधील बडगामध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले जवान निनाद मांडवगणेंच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाकडून मला मिळालेल्या आदर्श आमदार पुरस्कारच्या रकमेसह 1 लाख 2 हजार रूपये कुटुंबियांकडे सुपुर्द केले. आम्ही कुटुंबियांच्या सदैव पाठिशी राहू” असे म्हणत मुंडे यांनी आपण या कुटुंबीयाच्या सदैव पाठीशी आहोत असे सांगतिले.

जम्मू-काश्मीरच्या भारत-पाक सीमेवर सुरु असणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत लढाऊ हेलिकाॅप्टरद्वारे सीमेवर टेहाळणी करत असताना हेलिकाॅप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे (वय 33) यांना वीरमरण आले. नाशिकच्या अमरधामनजीकच्या मोकळ्या मैदानात त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे देखील त्यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होते. निनाद यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता.